गुरुवार, २७ जून, २०१३

(आरसा)

(कथा क्र.100) 

एक गुरूंच्‍या घरी एक शिष्‍य मनोभावे गुरुंची सेवा करून शिक्षण घेत होता. त्‍याच्‍या या सेवेमुळे गुरु त्‍याच्‍यावर प्रसन्न होते. शिक्षण् पूर्ण झाल्‍यावर विद्यार्थी घरी जाण्‍यासाठी निघाला तेव्‍हा गुरुंकडे त्‍याने जाण्‍याची आज्ञा मागितली तेव्‍हा गुरुंनी त्‍याला आशीर्वाद म्‍हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की, हा दिव्‍य आरसा (दर्पण) असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रगट होऊन दिसतात. विद्यार्थी मोठा आनंदीत झाला. हा आरसा खरेच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्‍यासाठी त्‍याने लगेच आपल्‍या गुरुंसमोर हा आरसा धरला व गुरुंच्‍या मनात कोणते भाव आहेत, दुर्गुण आहेत हे पाहू लागला आणि गुरुंच्‍या समोर आरसा धरताच त्‍याच्‍या चेह-यावरचा रंग पार उडाला कारण तो आरसा गुरुंच्‍या अंतकरणात मोह, अहंकार, क्रोध आदि विकार दाखवित होता. त्‍याला याचे फारच दु:ख झाले की आपण ज्‍या गुरुची मनोभावे पूजा केली, ज्‍यांना पूर्ण ईश्र्वराचा दर्जा दिला त्‍यांच्‍या मनातही विकार आहेत, ते सुद्धा मानवी विकारापासून अजून सुटलेले नाहीत याचे त्‍याला वैषम्‍य वाटले. तो गुरुंना काहीच न बोलता तो आरसा घेवून गुरुकुलातून निघाला, रस्‍त्‍यात भेटणा-या प्रत्‍येकाच्‍या मनातील भाव पाहणे हे त्‍याचे कामच झाले होते. गावी परत जाताच त्‍याने आपल्‍या प्रत्‍येक परिचिताबरोबर हा प्रयोग करून पाहिला. त्‍याला प्रत्‍येकाच्‍या हृदयात कोणता ना कोणता दुर्गुण दिसून आला. शेवट त्‍याने आपल्‍या जन्‍मदात्‍या आई वडीलांच्‍या समोरही हा आरसा ठेवला. ते दोघेही पण त्‍यातून सुटले नाहीत. त्‍यांच्‍या हृदयात पण त्‍याला काही ना काही दुर्गुण दिसले. शेवटी या गोष्‍टीचा त्‍याला मनोमन राग आला व तो गुरुकुलातील गुरुंकडे धावला. गुरुंपाशी जाऊन मोठ्या विनम्रपणे तो म्‍हणाला,’’ गुरुदेव, मी आपण दिलेल्‍या या आरशातून प्रत्‍येकाच्‍या मनात, हृदयात, अंत:करणात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्‍येकाच्‍याच मनात काही ना काही विकार आहेच, काही ना काही दोष आहे. एखाद्याच्‍या मनात कमी तर कुणाच्‍या मनात जास्‍त असे विकार, दोष भरून राहिले आहेत. हे पाहून मी फार दु:खी झालो आहे, कृपया मला मार्गदर्शन करा.’’ गुरुंनी काहीच न बोलता तो आरसा फक्त त्‍याच्‍याकडे केला आणि काय आश्र्चर्य त्‍याला त्‍याच्‍या मनाच्‍या प्रत्‍येक कोप-यात राग, द्वेष, अहंकार, क्रोध, माया आदि दुर्गुण भरून राहिलेले दिसले. गुरुजी म्‍हणाले,’’ वत्‍सा, हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्‍यासाठी दिला होता पण तू दुस-यांचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास, अरे याच कालात जर तू जर स्‍वत:चे अवलोकन केले असते तर तुला तुझ्यातील दुर्गुण सुधारता आले असते. याच काळात तु एक असामान्‍य व्‍यक्ती झाला असता. मानवाची ही कमतरता आहे, कमजोरी आहे की तो दुस-यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्‍वत:ला सुधारण्‍याचा प्रयत्‍नही करत नाही. हेच या आरशातून मला तुला शिकवायचे होते. जे तुला शिकता आले नाही.’’ 


तात्‍पर्य – आपण नेहमीच दुस-या व्‍यक्तीचे दुर्गुण बघतो, त्‍यावर टीका करतो पण आपल्‍यातील दुर्गुणांवर आपले कधीच लक्ष जात नाही. कधीतरी जर आपण आत्‍मनिरीक्षण केले तर आपल्‍यालाही आपले दुर्गुण सापडतीलच.

साभार - इंटरनेटवरून संग्रहीत 

सोमवार, २४ जून, २०१३

(हे ही दिवस जातील)

कथा क्र. ९९ 

एकदा एक राजा आपल्‍या महालात बसला होता. तेवढ्यात त्‍याला प्रधान येताना दिसला. प्रधान राजाजवळ आला, त्‍याने राजाला प्रणाम केला व राज्‍याच्‍या कारभाराविषयी दोघेही चर्चा करू लागले. थोड्यावेळाने एक द्वारपाल तेथे आला व म्‍हणाला,’’महाराज, द्वारावर एक संन्‍याशी आला आहे व तो आपल्‍या भेटीची वेळमागत आहे.’’ राजा संत, महात्‍मे, फकीर यांची कदर करणारा होता. राजाने द्वारपालाला संन्‍याशीमहाराजांना घेवून येण्‍यास सांगितले. द्वारपाल संन्‍याशी महात्‍म्‍याला घेऊन राजाकडे आला. महात्‍मा येताच राजाने स्‍वत: उठून त्‍यांना नमस्‍कार केला. आस्‍थेने विचारपूस केली. त्‍यांचा यथायोग्‍य सत्‍कार केला व त्‍यांना उपदेश करण्‍याविषयी सांगितले. संन्‍याशी महाराज म्‍हणाले,’’राजन, तुम्‍ही तुमचे राज्‍य अतिशय उत्तम पद्धतीने चालवित आहात, सर्व प्रजा सुस्थितीत आहे, सुखी आहे, कोणाचे कोणाशी भांडणतंटा नाही, सर्वधर्माचे लोक आनंदाने राहत आहेत, अन्नधान्‍य, पशूपक्षी सगळयात बरकत आहे. हे पाहून मला आनंद वाटतो’’ राजा म्‍हणाला,’’ महाराज ही स्‍तुती माझी एकटयाची नसून माझ्या सर्व सहका-यांची पण आहे. महाराज, ही स्‍तुती बाजूला ठेवून आपण मला भविष्‍यकाळासाठी काही उपदेश करावा अशी विनंती आहे.’’ संन्‍याशी महाराज म्‍हणाले,’’राजा, सदासर्वकाळ एकच परिस्थिती राहत नसते, त्‍यामुळे तुला फक्त एकच वाक्याचा मी उपदेश करतो. तो म्‍हणजे ‘’ हे ही दिवस जातील’’ एवढेच तु लक्षात ठेव’’ एवढे बोलून ते तेथून निघून गेले. राजा विचारात पडला, प्रधानाने हे पाहिले व तो म्‍हणाला,’’ महाराज, अहो संन्‍याशीमहाराजांनी केलेला उपदेश आपण फक्त लक्षात ठेवा म्‍हणजे झाले.’’ पण राजाची तगमग काही थांबेना, कारण एवढी सुबत्ता, समृद्धी असताना संन्‍याशाने आपल्‍याला हे ही दिवस जातील असे का म्‍हटले याचा त्‍याला उलगडा होईना. राजा रात्रंदिवस याच विचारात गढून गेला. काही दिवसातच दुस-या राजाने या राजाच्‍या राज्‍यावर स्‍वारी केली. राजा युद्धाच्‍या तयारीत कमी पडल्‍याने व परक्या राजाचे सैन्‍य आक्रमणावर आक्रमणे करीत राहिल्‍याने हा राजा हरला व त्‍याला बंदीवान करून त्‍या राजापुढे नेण्‍यात आले. तेथील राजाने या राजाला कारागृहात टाकले. कारागृहात अंधार कोठडीत कोणीच नसे. राजा एकटा निराश, हताश बसून राहत असे व आपल्‍या पूर्वीचे वैभव आठवित असे. त्‍यातच त्‍याला एक दिवशी संन्‍यासी बाबाबरोबर झालेली भेट आठविली व उपदेशही. झाले, त्‍या उपदेशाने राजाला आशा दाखविली, हे ही दिवस जातील, राजा निराशेकडून आशेकडे वळला आणि त्‍या दिवसापासून तो आनंदी राहू लागला. कारागृहाच्‍या सैनिकांना याचे कारण कळेना की कारागृहात कैदी म्‍हणून राहणारा राजा आनंदी कसा काय राहतो, त्‍यांनी त्‍यांच्‍या राजाला कळविले, तो राजाही विचारात पडला हे कसे काय साध्‍य झाले. त्‍याने या राजाला विचारले असता या राजाने संन्‍याशी महाराजांशी झालेली भेट व ‘हे ही दिवस जातील हा उपदेश सांगितला. त्‍याने हा उपदेश ऐकताच त्‍याला ही जाणीव झाली की आपणही एक राजा आहोत व आपल्‍यावरही ही वेळ येऊ शकते. हे जाणून त्‍याने राजाची मुक्तता केली, तसेच त्‍याचे राज्‍य त्‍याला परत दिले व मोठ्या सन्‍मानाने त्‍याला परत पाठविले.


तात्‍पर्य- विचारांमध्‍ये ताकद असते, एखादा विचार मानवाचे आयुष्‍य बदलून टाकू शकतो. 


माहित असलेली कथा

शुक्रवार, २१ जून, २०१३

(एकाग्रता)

(कथा क्र.९८) 

एकदा एक स्वामीजी काही मुलांचे निरीक्षण करत होते. ती मुले पुलावर उभे राहून नदीवर तरंगत जाणार्‍या अंड्याच्या टरफलावर बंदुकीने नेम साधण्याचा प्रयत्न करत होती.पाण्यामुळे ती टरफले वर-खाली होत होती. मुलांना त्यांच्यापैकी एकही टरफलावर नेम धरता आला नाही. त्यांनी अनेक वेळेला बंदूक झाडली पण प्रत्येकवेळी त्यांचा नेम चुकत राहिला. त्यांच्याकडे बराच वेळ स्वामीजींचे लक्ष होते. मुलेही हे पाहत होती. मुलांनी स्वामीजींना म्हटले," तुम्ही नुसतेच आमच्याकडे काय पाहत आहात? का आम्हाला नेम धरता येत नाही असे तुम्हाला वाटते? आणि असे असेल तर तुम्ही नेम धरून ती टरफले फोडून दाखवा. तुम्हाला जर असे वाटत असेल की तुम्हाला आमच्यापेक्षा अधिक चांगले जमते असे वाटते का?" स्वामीजी हसले आणि म्हणाले," मी प्रयत्न करून पाहतो." मुले म्हणाली," तुम्हाला वाटते तितके ते सोपे नाहीये." स्वामीजींनी बंदूक हातामध्ये घेतली आणि त्या अंड्याच्या टरफलावर नेम धरला, काही मिनिटे निश्चल राहिले, मग त्यांनी बंदूक चालवली, त्यांनी बारावेळा गोळ्या झाडल्या आणि बारावेळेला अंड्यांची टरफले उडविण्यात स्वामीजींना यश आले. त्या मुलांना फारच आश्चर्य वाटले,"एखादा माणूस पाण्यातील वाहणार्‍या अंड्याच्या टरफलावर इतका अचूक कसा नेम साधू शकतो?" असा प्रश्न त्यांना पडला. स्वामीजींनी मुलांच्या मनातील हे ओळखले, त्‍यांना ती मुले आवडली होती. ते म्‍हणाले,’’ जे काही तुम्‍ही करत होता त्‍यावर तुमचं मन एकाग्र करा. नेमबाजी करा किंवा अन्‍य काही. तुमचं लक्ष फक्त लक्ष्‍यावरच पाहिजे. तुमचा नेम कधीच चुकणार नाही. एकाग्रतेने बरेच काही साध्‍य करता येते. अवघड वाटणा-या गोष्टीसुद्धा या एकाग्रतेने सहजसाध्‍य होतात.’’ मुले स्‍वामींजींपुढे नतमस्‍तक झाली. 

तात्‍पर्य- एकाग्रता ही मानवी मनाचा मोठा दागिना आहे.त्‍याचा बहुतांश वेळेला वापर होत नाही. तो जर वापरला गेला तर अनेक गोष्‍टी साध्‍य करता येतात. ध्‍येय प्राप्‍तीसाठी एकाग्रता खूप महत्‍वाची आहे.
==============
वर्तमानपत्रातून संग्रहित 
==============

(चांगला श्रोता)

(कथा क्र.९) 

मैथिलीशरण गुप्त आधुनिक हिंदीच्या महान कवींपैकी एक होते. त्यांच्या रचना अमर असून त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले होते. एवढ्या मोठ्या यशानंतर ही गुप्त अत्यंत नम्र होते. ते आपल्यापासून लहान व नवोदित साहित्यिकांना मान देत असत. त्यांचा उत्साह वाढवीत असत. एक वेळची गोष्ट आहे. पाटणा महाविद्यालयाच्या प्रांगणात एक कविसंमेलन आयोजित केले होते. मैथिलीशरण गुप्त यांनाही या संमेलनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. देशातील अनेक विद्वान आणि कवि या समेलनाला उपस्थित होते. मंचावर काव्यवाचन सुरू होते आणि महाविद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थी याचा आनंद घेत होते. अनेक कवींचे कविता वाचन झाल्यावर एका नवीन कवीला मंचावर बोलविण्यात आले. त्याने कविता वाचन सुरू केले. विद्यार्थी आरडाओरडा करून त्याला विरोध करत होते. हे पाहून मैथिलीशरण गुप्त उठले आणि विद्यार्थ्यांना संबोधित करत म्हणाले,"आपण सर्वांनी अनेक वर्षे इंग्रजांची गुलामी सहन केली.आज आपण आपल्याच राष्ट्राच्या काव्यप्रतिभेची रचना आपण सहन करू शकत नाही का? चांगले ऐकणे हे आपल्या हातात आहे." हे ऐकताच सर्व विद्यार्थी शांत झाले. काव्यवाचन पुन्हा सुरू झाले. 

तात्पर्य- इतरांचे ऐकणे सन्मानजनक आहे. परंतु अनेकदा श्रवणज्ञान, अनुभव, शिकवण हे प्रेरणेचे माध्यमहि बनते. तसेच चांगला श्रोता असणे हा एक गुण आहे. 

==============
वर्तमानपत्रातून संग्रहित 
==============

रविवार, १६ जून, २०१३

(चंडकौशिक)

(कथा क्र.९६)

एक तपस्वी जंगलात आपल्या शिष्यांना शिक्षण देत होता. परंतु तो अत्यंत क्रोधी स्वभावाचा होता. एकेदिवशी तो रागाने आपल्या शिष्याला मारायला धावला मात्र तो मार्गात असलेल्या एका खांबाला धडकला आणि त्याचा मृत्यू झाला. मृत्‍युनंतर तो आपल्‍या तपोबलाच्‍या जोरावर पुन्‍हा जिवंत झाला. त्‍याचे नाव होते चंडकौशिक. त्‍याच्‍या आश्रमाच्‍या बगिच्‍यात फूल तोडण्‍यासाठी काही लोक घुसले होते. चंडकौशिकला हे समजले तेव्‍हा तो तात्‍काळ तेथे गेला. त्‍याला पाहताच लोक पळून गेले. चंडकौशिकला प्रचंड राग आला होता. तो कु-हाड घेऊन त्‍यांना मारायला धावला मात्र रागाच्‍या आवेशात येऊन विहीरीत पडला आणि त्‍याचा मृत्‍यू झाला. प्रचंड रागाच्‍या काळात मृत्‍यु होण्‍याच्‍या कारणांमुळे तो पुढच्‍या जन्‍मात तो भयानक विषारी साप बनला. भीतीपोटी लोकांनी तो ज्‍या वनात आहे तेथे जाणेच सोडून दिले. एकदा भगवान महावीर त्‍या जंगलात आले. लोकांनी त्‍यांना त्‍या वनात न जाण्‍याची विनंती केली. परंतु ते निर्भिडपणे गेले. महावीरांना पाहताच सापाने फुत्‍कारणे सुरु केले. परंतु महावीर त्‍याच्‍या बिळापाशी उभे राहिले. क्षमा आणि क्रोधाचा संघर्ष सुरु झाला. सापाने महावीरांच्‍या पायाचा कडाडून चावा घेतला. तर तेथून दुधाची धार सुरु झाली. साप हरला. तेव्‍हा महावीरांनी त्‍याला समजावले, ‘’ मित्रा, आता जरा जागा हो. जरा विचार कर, प्रत्‍येक जन्‍मात तू क्रोधाने इतरांना त्रास दिला आणि त्‍याबरोबरच स्‍वत:चेही नुकसान करून घेतले. क्रोधाने तुला काहीच मिळाले नाही उलट तू जे काही पुण्‍याईने मिळवले होते ते सोडून तुला पुन्‍हा जन्‍म घ्‍यावा लागला. क्रोधाने कमाविता येत नाही तर गमाविले जाते.’’ चंडकौशिक या बोलण्‍याने भारावून गेला आणि त्‍याने महावीरांची क्षमा मागितली. त्‍या दिवसापासून त्‍याच्‍या वृत्तीत फरक पडला 
===========================================
तात्‍पर्य- क्रोध ही तामसी वृत्ती आहे तर जीवनाचा आनंद सात्विकतेत आहे. रागाचा त्‍याग करणे हे मानवी जीवनाचे भूषण आहे.
==============
वर्तमानपत्रातून संग्रहित 
==============

(लोभाचे बळी)

(कथा क्र.९५)

एकदा एका व्यक्तीने घरी कार्यक्रमाचे आयोजन केले आणि त्यासाठी त्याने नातेवाईक, शेजार्‍यांना आमंत्रित केले होते, कारण अशा वेळेला भोजनासाठी अधिक भांड्याची गरज भासते. त्या व्यक्तीने आपल्या सर्व शेजार्‍यांकडून भांडी मागवली आणि सर्वांना जेवण दिले. दुसर्‍या दिवशी जेंव्हा शेजार्‍यांची भांडी परत केली तेंव्हा त्याने त्या भांड्यासोबत एक छोटे भांडे दिले. जेंव्हा शेजार्‍याने याचे कारण विचारले तेंव्हा त्याने म्हटले की "काल रात्री तुमच्या भांड्याने छोट्या भांड्यास जन्म दिला. त्यामुळे ही छोटी भांडी मी कशी ठेवून घेवू?" शेजारी प्रसन्न झाले. त्यांना आयतेच प्रत्येक भांड्याबरोबर एक लहान भांडे मिळाले होते. काही दिवसानंतर तोच माणूस जेव्‍हा आपल्‍या येथे भोजन आहे असा बहाणा करून शेजा-यांकडे भांडी मागण्‍यासाठी गेला तेव्‍हा शेजा-यांनी त्‍याला मोठया आनंदाने भांडी दिली. कारण शेजा-यांना याचा पूर्वानुभव होताच. काही जणांनी तर याला घरातील एकूण एक भांडी दिली. दुसर्‍या दिवशी त्या भांडे मागून नेणा-या व्यक्तीने भांडी परत केली नाहीत तेंव्हा सर्व लोक त्‍याच्‍या घरी आले आणि त्‍याला विचारू लागले की आमची भांडी कोठे आहेत. तेव्‍हा त्‍याने रिकामी खोली उघडून दाखविली व म्‍हणाला,’’ सर्व भांडी ईश्र्वराने नेली. सर्व भांडी मृत पावली. मी आता कोठून तुमची भांडी परत देऊ’’ सर्व लोक डोक़याला हात लावून बसले. कारण पहिल्‍यांदा जेव्‍हा त्‍याने भांडी नेली तेव्‍हा त्‍यासोबत एक भांडे जास्‍त दिले, तेव्‍हा लोभामुळे कोणी त्‍याला विरोध केला नाही, आता सर्वच भांडी गेली.

तात्‍पर्य- लोभाला बळी पडून आपण चुकीच्‍या गोष्‍टीला विरोध करत नाही मात्र जेव्‍हा हानी होते तेव्‍हा मात्र आपण विरोध करतो. लोभ हा सर्वथा वाईट आहे.

वर्तमानपत्रातून संग्रहित 

गुरुवार, १३ जून, २०१३

(भिक्षु आणि राजा)

(कथा क्र.९) 

एक राजा नेहमी उदास राहायचा. लाखो प्रयत्न करून त्याला शांतता मिळत नसे. त्याच्या नगरात एक भिक्षु आला भिक्षूच्या ज्ञानपूर्ण उपदेशाने राजा प्रभावित झाला त्याने भिक्षूला विचारले." मी राजा आहे, माझ्याकडे सर्व काही आहे पण मनाला शांतता मिळत नाही. मी काय करायला हवे?" भिक्षु म्हणाले,"आपण एकांतात बसून चिंतन करा." राजा दुसऱ्याच दिवशी आपल्या कक्षात आसन घालून बसला. तेव्हा महालाचा एक कर्मचारी सफाई साठी तिकडे आला. राजाशी तो चर्चा करू लागला. कर्मचाऱ्याला राजाने त्याची समस्या विचारली. ती ऐकून राजाचे हृदय भरून आले. त्यानंतर राजाने प्रत्येक कर्मचाऱ्याचे कष्ट व दु:ख जाणून घेतले. सर्वांची व्यथा जाणून घेतल्यावर राजाला समजले कि कमी वेतनामुळे सर्व कर्मचारी त्रस्त आहेत. राजाने त्यांच्या वेतनात वाढ केली. त्यामुळे ते खुश झाले. त्यांनी राजाचे आभार मानले. दुसऱ्या दिवशी राजाची भिक्षुशी भेट झाली. तेंव्हा भिक्षूने विचारले," राजन! आपल्‍याला काही शांतता मिळाली का?’’ राजा म्‍हणाला,’’ मला पूर्णपणे शांतता मिळाली नाही पण जेव्‍हापासून मी मनुष्‍याच्‍या दु:खाचे स्‍वरूप जाणले तेव्‍हापासून अशांतता थोडी थोडी कमी होत आहे.’’ तेव्‍हा भिक्षुने समजावले,’’ राजन, आपण आपला शांततेचा मार्ग शोधला आहे. बस्‍स, त्‍या मार्गाने पुढे जा, एक राजा तेव्‍हाच प्रसन्‍न राहू शकतो जेव्‍हा त्‍याची प्रजा सुखी असेल.’’

तात्‍पर्य – दुस-याचे दु:ख समजून घेण्‍यातच खरी शांतता लाभते. दुस-याच्‍या आनंदात जसे सहभागी होता येते तसे दु:खातही सहभागी व्‍हावे. त्‍याचे दु:ख कमी करता आले तर आपल्‍या मनाला शांतता मिळते. सहकार्य महत्‍वाचे आहे. 

वर्तमानपत्रातून संग्रहित 

(सम्राट आणि साधू)

(कथा क्र. ९) 


एक सम्राट रात्रीच्‍या वेळी राजधानीत फेरफटका मारीत असे आणि काय चालले आहे याचा आढावा घेत असे. फेरफटका मारत असताना सम्राटाला एक साधू जागा असलेला दिसायचा. त्‍याच्‍या कुटीत पाण्‍याचे मडके आणि दोन कपडयाशिवाय काहीच नव्‍हते तरी तो ‘’जागे रहा, झोपू नका, नाहीतर लुटले जाल’’ असा जोरजोरात आवाज देत असायचा. सम्राटाला वाटले हा साधू वेडा आहे मात्र त्‍याच्‍याशी एकदा बोलायला हवे. सम्राटाने एके दिवशी त्‍याला विचारले,’’तुमच्‍याकडे धनदौलत, गाडीघोडा, संपत्‍ती वगैरे काहीही नसतानासुद्धा तुम्‍ही इतके का जागता आणि सावधान राहता,’’ साधू म्‍हणाला,’’ राजा, आपण आपल्‍या महालात जो कचरा जमा केला आहे की, तो जर लुटला गेला तर काही फरक पडणार नाही, कारण आपण तो परत मिळवू शकता, परंतु या माझ्याकडे जे धन आहे ते लुटले गेले तर ते परत मिळणार नाही.त्‍यामुळे मी सदैव सावध राहतो.’’ राजा म्‍हणाला,’’ माझ्याकडे असलेल्‍या हत्ती घोडे, हिरे दागिने, सोने चांदी याला तुम्‍ही कचरा समजत आहात’’ साधूने उत्तर दिले,’’ ज्‍याला आपण अमूल्‍य समजत आहात ते धन, संपत्ती, हत्तीघोडे, राजवाडा कोणीही तुमच्‍याकडून हिसकावून घेऊ शकते पण माझी संपत्ती ही ईश्र्वरदत्त आहे. त्‍यामुळे मी स्‍वत:ला सावधान करतो, माझ्या मनात मोह, लोभ, मद, मत्‍सर, क्रोध, वासना, भय, अहंकार यांचा प्रवेश होऊ नये, अर्थात माझे मन हे ईश्‍वराने दिल्‍याप्रमाणे, लहान बालकाप्रमाणे कोरे असावे. या मानवी दुर्गुणांचा स्‍पर्श जर माझ्या मनाला झाला तर माझे कर्म बिघडेल आणि माझ्याकडून पाप घडेल. म्‍हणून मी रात्री स्‍वत:लाच सांगत असतो नव्‍हे माझ्या आत्‍म्याला सांगत असतो झोपू नको, तू झोपलास तर हे विषय तुझ्यावर आक्रमण करतील व तुला गिळंकृत करतील.’’ साधुचे ते विचार ऐकून राजा त्‍याचे चरणी लीन झाला व साधुला गुरुस्‍थान दिले.

तात्‍पर्य- मोह, लोभ, मद, मत्‍सर, क्रोध, वासना, भय, अहंकार यांची संगत न घेता जर जीवन जगण्‍याचा प्रयत्‍न केला तर जीवन सुखकर होते. वाईटापासून आपले संरक्षण होते. 

सदर कथा वर्तमानपत्रातून संग्रहित आहे 

सोमवार, १० जून, २०१३

(शेठजी आ‍‍‍णि त्‍याचा मित्र)

(कथा क्र.९२) 


एका शेठजवळ अपार संपत्‍ती होती, एके दिवशी त्‍याच्‍या मनात विचार आला की एक भव्‍य शिवमंदिर बनवावे. सहा महिन्‍यात मंदिर बनवून पूर्ण तयार झाले. मंदिर बनवून जे धन शिल्‍लक राहिले ते धन त्‍याने मंदिराच्‍या घुमटात गुप्‍त रितीने ठेवले. या गोष्‍टीचा उल्‍लेख त्‍याने आपल्‍या डायरीमध्‍ये करून ठेवला. त्‍यानंतर तो तीर्थयात्रेला निघुन गेला. परंतु तो रस्‍त्‍यातच मरण पावला. शेठला चार मुले होती. शेठजीच्‍या मृत्‍युनंतर काही दिवसातच त्‍यांना पैशाची चणचण भासु लागली, तेंव्‍हा त्‍यांनी आपल्‍या वडीलांची डायरी तपासायला सुरुवात केली. त्‍या डायरीत त्‍यांना घुमटातल्‍या धनाचा उल्‍लेख असलेली नोंद त्‍यांना पाहायला मिळाली. त्‍यात असेही लिहीलेले होते की, चैत्र शुद्ध नवमीला धन घुमटात ठेवण्‍यात आले आहे, त्‍या मुलांनी घुमट तोडला मात्र त्‍यात धन निघाले नाही. तेव्‍हा ते आपल्‍या वडिलांच्‍या बुजुर्ग मित्राकडे आले, आणि समस्‍या सांगितली. वडीलांच्‍या त्‍या बुजुर्ग मित्राने त्‍या चारही मुलांना चैत्र शुद्ध नवमीला रात्री बारा वाजता त्‍या ठिकाणी खोदायचे आहे जिथे तुमच्‍या वडीलांनी धन ठेवले आहे असे सांगितले, चंद्राच्‍या प्रकाशात घुमटाची सावली जेथे पडली होती, तेथे रात्री या म्‍हाता-या व्‍यक्तिने खोदायला स्‍वत: आधी सुरुवात केली आणि मग मुलांना खोदायला सांगितले. जेथे सावली पडली होती तेथेच बरोबर धन सापडले, मुलांना आनंद वाटला. मुलांनी बुजुर्ग व्‍यक्तिला धन्‍यवाद दिले, त्‍या धनाच्‍या मदतीने मुले व्‍यापारात पुन्‍हा उभे राहिले तसेच आपल्‍या पित्‍याच्‍या बुद्धीलाही दाद दिली.

तात्‍पर्य- वृद्धांचा अनुभव हा संपन्‍न असतो आणि तो नव्‍या पिढीसाठी मार्गदर्शक असतो.

वर्तमानपत्रातून संग्रहित 


(कृती)

(कथा क्र.९१)
 
एका गावात एक गरीब माणूस राहत होता शिक्षण नाही त्यामुळे कोणते चांगले कामही मिळत नव्हते, तो भिक्षा मागून आपले पोट भरत होता. एके दिवशी त्याला भिक्षेच्या रुपात तांदूळ मिळाले, तांदूळ त्याला फार दिवसांनी मिळाले होते. तो फार आनंदी होता. दुसऱ्या एका घरातून त्याला भाकरी आणि भाजी मिळाली. त्याने ती भाजीभाकरी खाल्ली आणि तांदूळ एका मडक्यात भरून भिंतीला असलेल्या खुंटीला अडकवून ठेवले. तो खाटेवर पडून आराम करू लागला.मडक्याला पाहून तो विचार करू लागला, त्यात आज तांदूळ आहेत. उद्याही तांदूळ मिळाले तर मडके अर्धे भरून जाईल, आणि असे जर तांदूळ मिळताच राहिले तर काही दिवसातच मडके तांदळाने भरून जाईल.मग आपण तांदळासाठी अशी ४-५ मडकी करू. २-३ महिन्यानंतर एक लहान पोतेभर तांदूळ जमा झाले कि ते तांदूळ आपण विकून टाकू. त्यातून पैसा मिळेल मग आपण अजून तांदूळ खरेदी करू ते जास्त भावाने विकू त्यात पैसा मिळेल असे करता करता आपल्याला भरपूर पैसा मिळू लागेल. पैसा जमा झाला कि आपण लग्न करू, मग मुले होतील, ती सुंदर आणि खोडकर असतील. मुलांना मी चांगले संस्कार करेन, त्यांनी जर ऐकले नाही तर तर त्यांना लाथ मारेन, असे विचार करत असताना त्याने खरोखरीच एक लाथ हवेत मारली आणि त्याच्या दुर्दैवाने ती लाथ तांदळाच्या मडक्याला बसली. त्याबरोबर ते मडके लाथेने हवेत भिरकावले गेले आणि मडके खाली पडून फुटले. त्यातील सगळे तांदूळ घरात साचलेल्या घाणेरड्या जागेत पडले. त्यासोबतच त्याचे स्वप्न भंग पावले.

तात्पर्य-कृती महत्वाची आहे. कृती आणि विचार यात जर साम्य नसेल तर हानी होते. जे विचारात आहे तेच कृतीत असायला हवे. 

वर्तमानपत्रातून संग्रहित 

शनिवार, ८ जून, २०१३

(इ-मेल)

  (कथा क्र ९० )   

एका तरुणाने शिक्षण पूर्ण झाल्यावर अनेक ठिकाणी अर्ज दाखल केले. काही ठिकाणी बोलावण्यात येवून नकार मिळाला तर काही ठिकाणी नुसताच नकार!. असेच एकदा त्याला एका मोठ्या कंपनीत इंटरव्ह्युसाठी बोलावण्यात आले. नेहमीप्रमाणे हा तरुण मुलाखतीस गेला, मुलाखत घेणाऱ्याने त्याला प्रश्न विचारले याने त्या प्रश्नांची योग्य उत्तरे दिली, आता याची निवड पक्की असे वाटत असतानाच कंपनीच्या प्रमुखाने त्याला सांगितले,"तुम्हाला आमच्या कंपनीत घेण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत. तुम्ही बाहेर जा आणि तुमचा इ-मेल आयडी द्या. आम्ही तुम्हाला मेल करू." तरुणाने काही सेकंद विचार केला आणि उत्तर दिले,"साहेब! मी तुम्हाला इ-मेल आयडी देवू शकत नाही कारण माझ्याकडे कॉम्प्युटर नाही त्यामुळे माझा इ-मेल आयडी पण नाही." प्रमुख म्हणाले,"अरे आजकालच्या या तंत्रज्ञानाच्या युगात तुमच्याकडे इ-मेल आयडी नाही म्हणजे तुम्ही नोकरीला लायक नाही. आमची कंपनी फक्त इ-मेल आयडी धारकांना नोकरी देते." तो तरुण तिथे काही उलटे उत्तर न देताच बाहेर पडला. त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरु झाले. खिशात फक्त १० रुपये होते, पोटात भूक होती, हातात काही काम नव्हते, चल मंडईत जावू आणि काही भाजी घेवू असा विचार करून तो मंडईत गेला. तिथे त्याने १० रुपयाचे बटाटे विकत घेतले आणि त्याच्या मनात काय आले कुणास ठाऊक पण ते विकायला तो तिथेच बसला.त्याच्या अंगी विक्रीची कला होती. काही वेळातच त्याने बोलून १० रुपयाचे २० रुपये मिळवले. सगळे बटाटे संपविले. मग त्याच्या लक्षात आले कि अरे आपण व्यापार करू शकतो. त्याने त्या २० रुपयाचे दुसऱ्या दिवशी अजून दुप्पट केले आणि भाजी घरोघर जावून विकू लागला. असे करता करता त्याने एक दुकान, एक ट्रक खरेदी केले व खूप श्रीमंत झाला. ५ वर्षात तो त्या गावातील मोठा श्रीमंत व्यक्तींमध्ये गणला जावू लागला. त्याचे लग्न झाले, मुलेबाळे झाली. आता त्यांच्या भविष्याची चिंता त्याला सतावू लागली. त्यासाठी त्याने एका पॉलीसी एजंटला बोलावले. तो एजंटही मोठी पॉलीसी मिळणार म्हणून आनंदाने आला. फॉर्म भरताना एके ठिकाणी एजंटाने त्याला त्याचा इ-मेल आयडी विचारला आणि तो व्यापारी मोठ्याने हसू लागला.एजंटला काहीच कळेना, तो म्हणाला ,"तुमच्याजवळ इ-मेल आयडी नाही का? तुमच्यासारख्या गावातील मोठ्या माणसाकडे इ-मेल आयडी नाही हि मोठी मजेची गोष्ट आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का कि इ-मेल आयडी नसतानासुद्धा तुम्ही इतके श्रीमंत आहात आणि जर का तुमच्याकडे इ-मेल आयडी असता तर?" तो व्यापारी (तरुण) उत्तरला," जर माझ्याकडे इ-मेल आयडी असता तर.................................................मी एका कंपनीचा कारकून राहिलो असतो. इतका श्रीमंत कधीच होवू शकलो नसतो."

तात्पर्य-आत्मविश्वासाने कोणतीही गोष्ट केल्यास आपले कुठल्याच गोष्टीत अडत नाही. 

गुरुवार, ६ जून, २०१३

(शेवटी मी आई आहे !!)

(कथा क्र. ८९) 

एलीस हि महाराणी व्हिक्टोरिया यांची मुलगी होती. लग्नानंतर तिला मुलगा झाला. मुलाची देखभाल करण्यासाठी राजवाड्यात नोकर-चाकरांची काही कमी नव्हती. तरीही एलीस लहान बाळाची खूप काळजी घेत असे. सतत त्याच्या सोबत राहून ती त्याची देखभाल करीत असे. तो क्षणभर जरी दृष्टीआड झाला तरी तिला चैन पडत नसे. तिचा मुलगा मग १० वर्षाचा झाला. एके दिवशी त्याला संसर्गजन्य रोगाची लागण झाली. तज्ञानी त्याच्यावर उपचार सुरु केले. डॉक्टरांनी तपासणी करून सल्ला दिला कि काही दिवस सर्वांनी याच्यापासून दूर राहावे कारण हा अतिशय जीवघेणा संसर्ग असून तो श्वासोच्छवासाद्वारे फैलावू शकतो. त्यामुळे त्याच्या संपर्कात कुणीही येवू नये. या डॉक्टरांच्या सांगण्यामुळे सर्व नोकरांमध्ये भीती पसरली. कोणीही नोकरचाकर किंवा कुणीच त्याच्या खोलीत जायला तयार नसे. परंतु एलीसने त्या परिस्थितीतही मुलाला एकटे सोडले नाही.ती त्याची सेवा करतच राहिली.एके दिवशी मुलगा म्हणाला,"आई ! बरेच दिवस झाले तू माझी पापी घेतली नाही, मला कुशीत घेतले नाही." शेवटी आईचेच हृदय ते !! एलीसने मुलाला जवळ घेतले व मायेने त्याला कुरवाळले, त्याची पापी घेतली. बरेच वेळ ती त्याच्या सानिध्यात राहिली. नको तेच झाले, तिच्या मुलाच्या संपर्कात राहण्याने तीपण त्या रोगाच्या तावडीत सापडली. नंतर अनेकांनी तिला विचारले,"हा रोग जीवघेणा असतानासुद्धा व तुला ते माहित असताना ही तू मुलाला का जवळ केले? असे करणे म्हणजे वेडेपणा आहे असे तुला वाटले नाही का?" एलीसने उत्तर दिले,"मी आई आहे. मी माझ्या मुलाला तडफडत कसे एकटे सोडू? तो तळमळत होता आणि मी आनंदात कसे राहू? मला माझे बाळ महत्वाचे आहे." 
शेवटी मुलासोबतच एलीसचेही निधन झाले. एलीसच्या समाधीवर इतकेच लिहिले होते,
===============================
""""""""""""" शेवटी मी आई आहे !!""""""""""""""""""
===============================
तात्पर्य-आई हे पृथ्वीतलावरचे ईश्वराचे रूप आहे. जे मुलांच्या सुखासाठी तळमळते, प्रसंगी जीवही देते, सर्वस्वाचा त्याग करते. त्या मातेला मग ती आपली असो किंवा दुसऱ्याची माता तिला दुखावले जाणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे.

वर्तमानपत्रातून संग्रहित 


सोमवार, ३ जून, २०१३

(मित्र)

(कथा क्र.८८)
 
विनोद आणि अजय यांची खूप चांगली मैत्री होती. ते एकाच वर्गात शिकत होते. विनोद मन लावून शिकायचा पण अजयचे मन मात्र सदैव इकडे तिकडे नेहमीच भरकटलेले असायचे. वर्गात शिक्षक शिकवत असताना अजयला नेहमी बोलणी खावी लागायची ती ह्याच लक्ष न देण्याच्या कारणावरून पण विनोद मात्र नेहमीच अभ्यासात पुढे राहायचा व शाबासकी मिळवायचा.एके दिवशी विज्ञानाचे शिक्षक वर्गात शिकवीत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना वहीमध्ये गृहपाठ करण्याची एक पद्धत सांगितली होती. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांनी गृहपाठ पूर्ण केला होता.पण अजयने मात्र आपल्या सवयीनुसार गृहपाठ व्यवस्थित पूर्ण केला नव्हता. त्याची वही पाहून शिक्षक रागाने त्याला म्हणाले,"हे तू काय केले आहेस? मी तर पानाच्या एका बाजूनेच लिहायला सांगितले होते पण तू दोन्ही बाजूने लिहीले आहेस." आता अजय घाबरला. कारण शिक्षकांनी त्या दिवशी सुट्टी होण्याच्या आत वही पूर्ण करायला सांगितले होते आणि सुट्टी होण्यास फक्त दोनच तास राहिले होते. अजयला घाबरलेल्या अवस्थेत पाहून विनोदने त्याला त्याच्या लक्ष न देण्याच्या सवयीबद्दल उपदेश केला व शिक्षकांकडून परवानगी घेवून बाजारात जावून नवीन वही आणली. इतकेच नाही तर अजयसोबत बसून त्याचा गृहपाठ पूर्ण केला आणि त्याची वही शिक्षकांकडे जमा केली. त्या दिवसापासून अजयने आपल्या स्वभावात बदल केला आणि तो कोणतेही ठिकाणी लक्षपूर्वक काम करू लागला.

तात्पर्य- लक्षपूर्वक काम करणे आणि विवेकबुद्धी जागृत ठेवून काम करणे या दोन गोष्टी पाळल्यास अनेक संकटावर मात करता येते. तसेच होणारे नुकसान टाळता येते.

वर्तमानपत्रातून संग्रहित 

रविवार, २ जून, २०१३

(ईश्वरचंद्र विद्यासागर )

(कथा क्र. ८७) 


पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या अंतकरणात प्रत्येक प्राणीमात्राबद्दल असलेली करुणा पाहून लोक त्यांना 'विद्यासागर' च्या ऐवजी करुणा सागर असे म्हणत असत. असहाय्य प्राणीमात्रावर त्यांची करुणा आणि कर्तव्यपरायणता बघण्यासारखी होती. त्यांच्या आयुष्यात ते कोलकत्ताच्या जवळ असणाऱ्या एका छोट्याशा भागात प्राध्यापक पदावर नियुक्त होते. एके दिवशी संध्याकाळी पावसाने सुरुवात केली. पाऊस पडायला लागला तसे वातावरणही थंड होवू लागले. ईश्वरचंद्र विद्यासागर हे आपल्या कामात व्यस्त होते. ते त्यांच्या अभ्यासात मग्न असतानाच अचानक त्यांच्या दारावर कोणीतरी थाप टाकली. पंडितजी उठले व दरवाजा उघडला तर एक अनोळखी माणूस दारात भिजलेला त्यांनी पाहिला. त्यांनी त्या माणसाला घरात घेतले. अंग पुसण्यासाठी कपडे व आपले स्वतःचे नवीन कपडे त्याला घालण्यासाठी दिले. तो अनोळखी पाहुणा या अचानक झालेल्या स्वागताने अचंबित झाला आणि त्याचा त्या प्रेमाने कंठ दाटून आला. तो पाहुणा म्हणाला," मी या भागात नवीन आहे. मी माझ्या मित्राकडे पाहुणा म्हणून आलो होतो पण त्याच्या घरापाशी गेलो तर तिथे चौकशी केल्यावर मला समजले कि तो गावाला गेला आहे. आता या पावसाच्या रात्री मी खूप जणांकडे आसरा मागितला पण कुणीच मला आसरा दिला नाही. सगळ्यांनी मला हाकलून दिले. तुम्ही पहिली अशी व्यक्ती आहात ज्यांनी मला आसरा दिला आणि मला इतके आदरातिथ्य केले. यावर ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणाले,"अरे मित्र! तुम्ही तर माझे अतिथी आहात. आणि आपल्या शास्त्रात तर अतिथीला देव मानले आहे. मी तर फक्त माझे कर्तव्य केले आहे." हे म्हणत असतानाच त्यांनी त्याच्यासाठी गरम कपडे, अन्न आणि झोपायची व्यवस्था करायला सुरुवात केली. पाहुण्याने गरम जेवण केले व झोपी गेला. सकाळी जेंव्हा तो परत निघाला तेंव्हा ईश्वरचंद्र विद्यासागर त्याला म्हणाले," अतिथी देवा ! झोप कशी झाली?" त्यावेळी त्या पाहुण्याने त्यांना मनोमन नमस्कार करत तो म्हणाला," खरे देव तर तुम्ही आहात, ज्याने संकटकाळात माझ्यासारख्या अनोळखी माणसाला घरात घेवून त्याचे एखाद्या जवळच्या माणसाप्रमाणे बडदास्त ठेवली. अशी देवमाणसे आज दुर्मिळ होत चालली आहेत. माझ्या संपूर्ण आयुष्यात मी हे तुमच्यासोबत घालविलेले क्षण कधीच विसरणार नाही." 

तात्पर्य- आपल्या हातून एखाद्या प्राणिमात्राला जर काही मदत करता येत असेल तर ते करणे आपले कर्तव्य ठरते.

इंटरनेटवरून संग्रहित 

(सुरक्षितता)

 (कथा क्र. ८८) 


एकदा एका हरणाचा एक डोळा निकामी झाला. मग त्याला युक्ती सुचली. त्याने समुद्राच्या काठी फिरायला सुरुवात केली. त्याला वाटले आपल्याला धोका आहे तो जमिनी कडूनच कारण कोणताच शिकारी समुद्रातून येणारच नाही. एक डोळा जमिनीकडे लावून आपल्याला आपल्या अन्नाची सोय करता येईल. एक शिकारी बरेच दिवस त्या हरीणाकडे लक्ष ठेवून होता. बरेच दिवस तो त्याला मारण्यासाठी टपून होता पण ते हरीण काही त्याच्या तावडीत सापडत नव्हते. त्याची शिकार काही त्याला होत नव्हती. जमिनीच्या बाजूने जेंव्हा शिकारीची वेळ येई तेंव्हा हरीण पळून जात असे. मग त्याला एक कल्पना सुचली. त्याने एक दिवस एक नाव घेतली व समुद्रामध्ये सकाळपासून फिरत राहिला. अचानक संध्याकाळच्या वेळी त्याने हरणावर गोळी झाडली. नेम अचूक लागला. हरणाला गोळी लागल्यावर हरीण मरणोन्मुख झाले. मरता मरता ते स्वतःशीच म्हणाले,"ज्या डोळ्याने मला दिसत नव्हते तोच डोळा मी समुद्राकडे ठेवून फिरत राहिलो. पण समुद्राच्या बाजूनेच माझा घात झाला. मला समुद्राच्या बाजूची खात्री होती पण त्या बाजूनेच मला मरणाच्या दारात पोचविले."

तात्पर्य-आपल्या जिथे सुरक्षितता वाटते तिथूनच काही वेळा धोका होऊ शकतो. सुरक्षितता/सावधानता हि सदैव बाळगली पाहिजे. सर्वच बाबतीत ! खरेय ना !!

वर्तमानपत्रातून संग्रहित