शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१३

(अपमान आणि उपकार)

कथा क्र.132

एकदा दोन मित्र वाळवंटातून चाललेले असतात, रस्त्यात त्यांच्यात काहीतरी बाचाबाची होते आणि बाचाबाचीचे रुपांतर भांडणात होते. इतके कडाक्याचे भांडण होते कि एक मित्र दुसऱ्या मित्राच्या थोबाडीत ठेवून देतो. ज्याला थोबाडीत बसते तो दुसरा मित्र खूप दुःखी होतो, गप्प बसतो आणि वाळूमध्ये बोटाने लिहितो," आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला थोबाडीत दिली, ज्याला मी जीवापाड मैत्री करतो त्याने मला आज मारले." ज्याने थोबाडीत मारलेली असते तो हे पाहतो पण काहीच न बोलता दोघेही पुढे चालत राहतात. पुढे गेल्यावर त्यांना एक तलाव दिसतो, दोघेहीजण पाण्यात उतरून स्नान करायचे ठरवतात, अंघोळ करता करता थोबाडीत खाल्लेला मित्र अचानक पाण्यात घसरतो, तिथे नेमकी दलदल असते, तो जोरजोराने ओरडायला सुरुवात करतो. ज्याने थोबाडीत मारलेली असते तो मित्र क्षणाचाही विचार न करता आपल्या मित्राच्या सहाय्याला धावतो आणि त्याला त्या दलदलीतून बाहेर ओढून काढतो. जेंव्हा तो बुडणारा मित्र पाण्याबाहेर येतो, अंग कोरडे करतो तेंव्हा तो एका दगडाने दगडावर कोरून लिहितो,"आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला मरणाच्या दारातून ओढून परत आणले, मी आज मेलोच असतो पण त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचविले." हे पण तो थोबाडीत देणारा वाचतो आणि त्याला राहवत नाही तो त्या मित्राला विचारतो कि,"पहिले मी तुला मारले तर ते तू वाळूत लिहिले आणि आता तुला पाण्यातून वाचविले तर ते तू दगडावर कोरून लिहिले हे असे का?" लिहिणारा मित्र म्हणाला," जेंव्हा कोणी आपल्या हृदयाला,मनाला,भावनेला ठेच लावेल तेंव्हा ते सर्व काही वाळूत लिहावे कारण काही काळानंतर वाळू हि विस्कळीत होवून जाते आणि मनातील भावनाही फार काळ एकसारख्या राहत नाहीत. पण जर कुणी उपकार केले तर ते मात्र दगडावर कोरून लिहिले कारण दगडावर कोरलेले जसे कायमस्वरूपी टिकून राहते तसे उपकार हे कायम लक्षात ठेवले जावेत. 

तात्पर्य-"माणसाने अपमान तत्काळ विसरून जावा आणि उपकार आजन्म लक्षात ठेवावे."

मुर्खाशी गाठ

कथा क्र.131 

एकेदिवशी बादशहाने बिरबलाला बोलावले आणि म्‍हणाला, ''बिरबल, एक प्रश्‍न असा कायम मला पडतो की, तू जर इतका हुशार आहेस तर तुझे वडील किती हुशार असतील. मला एकदा त्‍यांना भेटायचे आहे. वडीलांइतकी हुशारी तर तुझ्यात नक्‍कीच नसणार तेव्‍हा मला त्‍यांची हुशारी किती आहे हे पहायचे आहे'' 
बिरबल म्‍हणाला,''महाराज, माझे वडील ग्रामीण भागात राहणारे एक अडाणी, सरळमार्गी, देवभोळे आहेत. ते कसले हुशार असणार तेव्‍हा त्‍यांच्‍या भेटीतून आपल्‍याला काय निष्‍पन्न होणार आहे तेव्‍हा त्‍यांच्‍या भेटीचा नाद सोडून द्या.'' अकबराला वाटले की बिरबल मुद्दाम वडीलांना भेटू देत नाही कारण याच्‍यापेक्षा याचे वडील खूप हुशार आहेत आणि वडील हुशार आहेत हे बिरबलाला ठाऊक असल्‍याने आपली पत कमी होईल या भितीने बिरबल त्‍यांना भेटू देत नाहीये. अकबराने बिरबलाला एक आदेश दिला की आठ दिवसात जर तू तुझ्या वडिलांना दरबारात घेऊन आला नाहीस तर तुला शिक्षा केली जाईल. आता बिरबलापुढे प्रश्‍न उभा राहिला कारण खरोख्ररीच त्‍याचे वडील हे सरळमार्गी होते. बिरबलाने गावाकडे निरोप पाठविला आणि वडीलांना बोलावून घेतले. त्‍यांना दरबारात जाण्‍यापूर्वी चांगला पोशाख घातला आणि त्‍यांना काही कानमंत्र दिला. बिरबल वडीलांना म्‍हणाला,'' बादशहा तुम्‍हाला भेटू इच्छितात, तिथे गेल्‍यावर तो तुम्‍हाला कोणतेही आडवेतिडवे प्रश्‍न विचारेल पण काही केल्‍या तुम्‍ही तोंड उघडू नका. एकही शब्‍द न बोलता गप्‍प बसून रहा. बादशहा चिडेल, संतापेल पण तुम्‍ही कोणतीच प्रतिक्रिया देऊ नका.'' झाले बिरबलाचे वडील बादशहाच्‍या दरबारात पोहोचले. बादशहा दरबारात येताच वडीलांनी त्‍यांना सलाम केला. बादशहाने त्‍यांना बिरबलाचे वडील म्‍हणून ओळखले पण बोलायला काही तरी सुरुवात करायची म्‍हणून त्‍याने विचारले,'' तुम्‍हीच बिरबलाचे वडील का'' वडील गप्‍पच. त्‍याने पुन्‍हा विचारले,'' तुम्‍ही कुठे राहाता, गावाचे नाव काय, शेती कशी आहे, पाऊसपाणी कसे आहे, गावातील मंडळी कशी आहेत,'' असे अनेक प्रश्‍न विचारले तरी बिरबलाने सांगितल्‍याप्रमाणे वडील गप्‍पच होते. शेवटी बादशहा वैतागला, चिडला आणि संतापाच्‍या भरात बोलून गेला, ''काय बुद्धी झाली आणि या मूर्खाला मी बोलावून घेतले. असल्‍या मूर्खाशी अशीकशी माझी गाठ पडली की जो साध्‍या प्रश्‍नांची सुद्धा उत्तरे देत नाहीये.'' बिरबलाचे वडील मूर्ख शब्‍द ऐकून मनातून संतापले होते पण बिरबलाने सांगितले होते की, काही झाले तरी तोंड उघडायचे नाही. बादशहा कंटाळून निघून गेला व वडीलसुद्धा घरी गेले. त्‍यांनी हा प्रकार बिरबलाच्‍या कानावर घातला. बिरबलाने त्‍यांची समजूत घातली व शांत राहाण्‍यास सांगितले. चार दिवसांनी जेव्‍हा बिरबल पुन्‍हा दरबारात गेला तेव्‍हा बादशहा बिरबलाला म्‍हणाला,'' बिरबल मला तुझ्याशी काही महत्‍वाचे बोलायचे आहे तेव्‍हा तू जवळ ये.'' बिरबल जवळ गेला. बादशहा हळूच त्‍याला म्‍हणाला,'' बिरबल, आपली गाठ जर मूर्खाशी पडली तर काय केले पाहिजे'' बिरबल तात्‍काळ उत्तरला,''महाराज आपण शांत रा‍हिले पाहिजे, गप्प बसले पाहिजे.'' बादशहा म्‍हणाला, '' ते कसे काय'' बिरबल म्‍हणाला,'' माझे वडील नाही का तुमच्‍यासमोर गप्प बसले होते तसेच'' हे ऐकून बादशहाचे तोंड बघण्‍यासारखे झाले. 

तात्‍पर्य-मूर्खाशी वाद घालू नका, गप्प रहा. 

वर्तमानपत्रातून संग्रहित

(कथा आईनस्‍टाईनची)

कथा क्र.130 

अल्‍बर्ट आईनस्‍टाईन लहान‍पणी शिक्षणाच्‍या बाबतीत फारच विरक्त होते. त्‍यांना शाळेत जाणे आणि शिकणे अजिबात आवडत नव्‍हते. जेव्‍हा शाळेचे शिक्षक अल्‍बर्ट यांना एखाद्या विषयाबाबत आठवायला सांगत तेव्‍हा त्‍यांना तो विषय आवडत नसे. त्‍यांना तर चिंतन-मनन करणे आवडायचे. एका विषयावर विचार करत असताना ते तासनतास घालवत असत. त्‍यावेळी त्‍यांना शिक्षकांच्‍या शिक्षेस सामोरे जावे लागत असे. एकेदिवशी अल्‍बर्टने आपल्‍या आईवडीलांना सांगितले की, मी आता शाळेत जाणार नाही. आईने कारण विचारले, तेव्‍हा छोटा अल्‍बर्ट म्‍हणाला,''आई तेथे शिक्षण नाही तर पोलिस शिकवतात, छोट्या छोट्या कारणावरून रागवतात, मला ते सहन होत नाही आणि गणित विषय हा तर मला खायला उठतो.'' तेथेच अल्‍बर्टचे काका जेकब बसलेले होते ते त्‍याची गोष्‍ट ऐकून म्‍हणाले,'' बेटा, हे काय सांगत आहेस की तुझे मन गणितात लागत नाही, मग तुझे खेळातही मन लागत नाही का.'' अल्‍बर्ट म्‍हणाला'' खेळात तर माझे मन लागते'' जेकब म्‍हणाले,'' तर ये मग, आपण चोर-पोलीस खेळूया'' जेकबने काही रेषा काढल्‍या आणि गोटया सरकावू लागले. अल्‍बर्ट यांची खेळातली आवड आणि कौशल्‍य पाहून जेकब म्‍हणाले,'' हेच तर बीजगणित आहे त्‍यात संख्‍यांचा शोध घ्‍यावा लागतो.'' अल्‍बर्ट म्‍हणाला,'' काका, हेच गणित आहे, यात अवघड असे काहीच नाही, असे गणित जर असेल तर मी शाळेत जायला तयार आहे'' 

तात्‍पर्य-विषय सोपा करून सांगणे ही शिक्षकाची आवड असली पाहिजे. शिक्षकांनी सोपे करून सांगितल्‍यास विद्यार्थ्‍याना लगेच समजते. पालकांनीही मुलांच्‍या शिक्षणाकडे लक्ष दिल्‍यास मुले नवीन कल्‍पना स्‍वीकारू लागतात व त्‍यातून चांगला परिणाम मिळतो.

==============
वर्तमानपत्रातून संग्रहित 
==============

(सत्य)

कथा क्र. 129

एक राजा होता. राजाच्या इच्छेपुढे कोणाचे काही चालत नसे. एके दिवशी त्याला काय इच्छा झाली कुणास ठाऊक पण त्याने दरबारात आज्ञा दिली कि मला स्वर्गातील फुलांचा हार गळ्यात घालायला पाहिजे आहे. दरबारातील सारे विचारात पडले कि असा हार कसा मिळवायचा?. एका विद्वान मुनींनी राजाचे हे आव्हान स्वीकारले आणि राजाला स्वर्गातील हार आणून देण्याचे कबूल केले. काही दिवसानंतर मुनी राजाकडे आले व म्हणाले,"राजन! मला स्वर्गातील हार तर मिळाला आहे पण हाराबद्दल एक अडचण आहे." राजा म्हणाला,"काय आहे ती अडचण?" विद्वान मुनी म्हणाले,"तो स्वर्गातील हार फक्त पुण्यवान लोंकानाच दिसेल. पापी लोंकाना हा हार दिसणार नाही." या नंतर मुनींनी राजाच्या गळ्यात हार घालण्याचे नाटक केले व एक दोरी त्याच्या गळ्यात घातली. राजाला कळेना कि आपल्या गळ्यात अशी दोरी का घातली आहे. राजा विचारात पडला कि आता याला दोरी म्हणावे कि हार? कारण दोरी म्हणाले तर पापी ठरतो आणि हार म्हणावे तर दोरी गळ्यात घालून फिरावे लागते. तो काहीच बोलला नाही त्याने ते स्वीकार केले व गप्प राहिला. दरबारातील लोकांनीही हाच विचार केला कि राजाला जर दोरी घालणे पसंत असेल तर आपण कशाला काही बोलायचे आणि हार नाही म्हंटले तर आपण पापी ठरतो. म्हणून दरबारीही गप्प राहिले. दोन-तीन दिवसांनी दरबारातील एक जुना सरदार गावावरून परत आला. त्याला या प्रसंगाची काहीच कल्पना नव्हती. त्याने येताक्षणी राजाला विचारले,"राजेमहाराज!आज पर्यंत मी तुम्हाला हिरे माणिक,मोत्यांचे हार घातलेले पहिले आहे पण आज हि दोरी का गळ्यात अडकवून तुम्ही फिरत आहात." झाले दरबारातील सर्वांनी मोठा गलका केला कि जगातील सर्वात मोठा पापी मनुष्य सापडला, याला राजाच्या गळ्यात हार न दिसता दोरी दिसते आहे. राजाला पण राग येवून त्यांनी त्याला तुरुंगात डांबले.


तात्पर्य-आजच्या काळात पण असेच झाले आहे, जो कोणी सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो त्याचे म्हणणे हे दाबून ठेवले जाते व सत्य जगासमोर येत नाही.


वर्तमानपत्रातून सं‍ग्रहित

शनिवार, २१ सप्टेंबर, २०१३

(मन माणसाचे अन डोके...............?)

कथा क्र. 128

एका माणसाला काही कामानिमित्त आपल्या गावातून शहराकडे जायचे होते. तो बेरोजगार होता व गावात त्याला काही काम उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्याने शहरात जाऊन काम करण्याचे ठरवले होते. जवळ पैसे नसल्याने गावापासून शहरापर्यंतचा प्रवास तो पायीच करणार होता. त्याला ज्या रस्त्याने जायचे होते तो रस्ता जंगलातून जाणारा होता. त्यामुळे त्याला जंगली श्वापदांची भीती वाटत होती. परंतु दुसरा काही मार्ग नसल्याने त्याने धाडस करून जंगलात प्रवेश केला. काही अंतर गेल्यावर त्याला झाडावर एक माकड दिसले. त्याला पाहताच माकडाने झाडावरून त्याच्या पुढ्यात उडी मारली. परंतु माकडाने त्याला काही इजा केली नाही. उलट त्याने माणसाला त्याच्याबाबत माहिती विचारली. त्यावर माणसाने बरीच मोठी पाल्हाळीक कथा त्याला ऐकवली. ती ऐकल्यावर माकडाने त्याला पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले. पण त्यासाठी त्याला एक अटही घातली, तू मला क्षणभरही कामाशिवाय मोकळे सोडायचे नाही. नाही तर मी तुला मारून टाकीन. माणसाने त्या माकडाची अट मान्य केली. माकड त्या दिवसापासून माणसाची सर्व कामे करू लागले. माणसाची सर्व कामे करून माकड त्याच्यासोबत चांगलेच रुळले. परंतु माणसाच्या मनात मात्र, सुरुवातीला हा आपल्याला मारणार तर नाही ना? अशी धास्ती वाटत होती. पण नंतर त्याला एक युक्ती सुचली. माकडसाठी जेव्हा काहीच काम नसे तेव्हा माणूस एक शिडी लावून त्यावर माकडाला चढ - उतार करण्यास सांगत असे. हळूहळू माकडाला त्याची सवय झाली. माणसाची सर्व कामे ते करू लागले.

तात्पर्य : माकड हे मानवी मेंदूचे प्रतीक आहे. आपण मेंदूला सदैव विविध कार्यात गुंतवून ठेवले पाहिजे. तरच ते सदैव रचनात्मक विचारांनी प्रेरित होऊन सकारात्मक योगदान देत राहील. परंतु त्याला काही काम नसेल तर ते नकारात्मक विचार करू लागेल. हिंसक होईल, भरकटेल. त्यामुळेच म्हटले जाते की, रिकामा मेंदू हा सैतानाचे घर असतो.

==============
वर्तमानपत्रातून संग्रहित 
==============

शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०१३

(मनाची शुद्धता)

कथा क्र. 127

दोन तरुण साधु उंच डोंगरावर असणाऱ्या आपल्या मठाकडे निघाले होते. रस्त्यामध्ये एक ओढा होता. तो ओढा खूप पाण्याने भरलेला असून खोलही होता. त्या ओढ्याच्या काठी एक तरुण युवती बसलेली होती. त्या तरुणीलाही तो ओढा पार करून पलीकडील बाजूस असणाऱ्या गावात जायचे होते. पण ओढ्याला असणाऱ्या पाण्यामुळे ती तो ओढा पार करू शकत नव्हती. पावसाळ्याचे दिवस होते, पाउस पडत होता, ओढा जोराने खळखळत वाहत होता. तरुणीला तर ओढा पार करून पलीकडे जाणे गरजेचे होते. पाण्याला ओढ जास्त असल्याने ती एकट्याने पाण्यात उतरण्याचे धाडस करत नव्हती. दोन साधुंपैकी एका साधूने हे दृश्य पाहिले व त्याने त्या तरुणीला विश्वासपूर्वक दोन गोष्टी सांगितल्या व त्या तरुणीला आपल्या खांद्यावर बसवले आणि त्या तिघांनी मिळून तो ओढा पार केला. तरुणीने तो ओढा पार होताच साधूचे आभार मानले व ती आपल्या गावात निघून गेली. दोन्ही साधू आपल्या आश्रमाकडे निघाले. ज्या साधूने तरुणीला खांद्यावर घेतले होते त्याच्याशी दुसरा साधू बराच वेळ काहीच बोलला नाही. खूप वेळ घुश्यात चालल्यावर त्या साधूने दुसऱ्या साधूच्या मनातील चलबिचल ओळखली व तो त्याला म्हणाला,"मित्र! बरेच वेळ मी पाहतो आहे पण तुला काही तरी खुपते आहे.तेंव्हा विना संकोच तू मनातील गोष्ट मला सांग." तो दुसरा साधू म्हणाला,"हे मित्रा, आपल्या संप्रदायामध्ये स्त्री स्पर्श सुद्धा वर्ज्य आहे. तरी तू त्या स्त्रीला खांद्यावर बसवून ओढा पार केलास हे काही मला आवडले नाही. स्त्रीकडे बघणे, स्पर्श करणे हे महत्पाप तू केले आहेस. तेंव्हा तू माझ्या मनातून उतरला आहेस." त्यावर तो मदत करणारा साधू म्हणाला,"असं आहे तुझ्या नाराजीचे कारण! पण मित्रा, ती स्त्री जेंव्हा माझ्या खांद्यावरून उतरली तेंव्हाच मी तिला सोडले, मात्र तू अजूनही तिला मनात बाळगून आहेस. मी तिला मदत करण्याच्या दृष्टीने स्पर्श केला पण तू अजूनही मनातून तिला वारंवार स्पर्श करत आहेस. संन्यास याचा अर्थ कुणाचीही सेवा न करता अलिप्त राहणे असा न होता मनातील वासना आणि विकारांवर ताबा मिळवणे असा होतो. ज्यावेळी त्या स्त्रीला मी उचलून खांद्यावर घेतले तेंव्हाही माझ्या मनात फक्त सेवेची भावना होती मग ती स्त्री आहे का पुरुष याचा मी विचार केला नाही. मनातून सुद्धा विकार जर संपविता आले तरच साधुपण आले असे समजता येईल आणि मग त्यासाठी संन्यास घेण्याचीही आवश्यकता नाही. गृहस्थ राहूनही जर विकारांवर नियंत्रण करता आले तर त्या व्यक्तीला साधुपण मिळेल."

तात्पर्य- मनातून चांगले आचरण असल्यास बाहेरील आचरण हे चांगलेच होते. मनात पाप ठेवून चांगले बनता येत नाही.


वेडे सांबर

कथा क्र. 126

एक सांबर नदीत आपले रूप पाहत होते. पाहता पाहता ते मनाशी बोलू लागले, ''अहाहा, ही माझी शिंगे किती छानदार आहेत! ही किती शोभिवंत दिसतात! अशी चांगली शिंगे देवाने कोणालाही दिली नाहीत! पण हे पाय बाकी फारच वाईट आहेत! किती रोडके आणि घाणेरडे आहेत! अरेरे, यापेक्षा मला मुळीच पाय नसते तर किती बरे झाले असते!'' सांबर असा विचार करीत आहे तोच काही शिकारी तेथे आले! पावलांची चाहूल लागताच सांबर जीव घेऊन पुढे पळू लागले व पारधी मागे पाठलाग करू लागले. पळता पळता सांबराची शिंगे एका काटेरी झुडपात अडकली. सांबराने बरीच खटपट केली तरी शिंगे काही निघेनात! अखेर शिकारी लोकांनी येऊन सांबराला ठार मारले! मरताना ते बोलले, ''अरेरे, उगीच मी या पायाला नावे ठेवली! तेच बिचारे मला पळताना उपयोगी पडले! पण या शिंगांनी बाकी माझा जीव घेतला!''
 
तात्पर्य =जे वरून चांगले दिसते तेच चांगले नसते! जे उपयोगी पडते तेच खरोखर चांगले!

==============
वर्तमानपत्रातून संग्रहित 
==============

उंदीर, कोंबडा आणि मांजर

कथा क्र. 125

एका उंदिराचे पिटुकले पहिल्यांदाच आपल्या बिळातून बाहेर पडले होते. ते इकडे तिकडे फिरून पुन्हा बिळात गेल्यावर आपल्या आईस म्हणते, "आई, ज्या या लहानशा जागेत लहानाचे मोठे केले, ती जागा सोडून आज मी अंमल बाहेर जाऊन आलो. तेथे मी जी फौज पाहिली, ती काही विलक्षणच. रस्त्याच्या बाजूने फिरत असता, मी दोन प्राणी पाहिले, त्यापैकी एक प्राणी फार गडबड्या स्वरुपाचा असून त्याच्या डोक्यावर तांबड्या रंगाचा तुरा आहे. तो प्राणी जेव्हा जेव्हा आपली मान हालवी, तेव्हा तेव्हा तो तुराही हालत असे. मी त्याची ही मौज पहात आहे, इतक्यात त्याने आपले दोन्ही हातही हालविले आणि असा काही कर्कश्श शब्द केला, की त्याने माझ्या कानठळ्याच बसून गेल्या आणि दुसऱ्या प्राण्याची गोष्ट ऐक. तो प्राणी फार सभ्य आणि शांत असून, त्याच्या अंगावर रेशमासारखी मऊ लोकर होती. तो चांगला देखणा असून त्याचे एकंदर वर्तन असे होते, की मला त्याच्याशी आपली मैत्री व्हावी असे वाटल्याशिवाय राहिले नाही.' हे भाषण ऐकून उंदरी त्यास म्हणाली, "वेड्या पोरा! तुला काडीचीही अक्कल नाही. नुसत्या दिखाऊपणावर जाशील तर फसशील, हे लक्षात ठेव. तू जो प्राणी पाहिला आहे तो लबाड व क्रूर मांजर आहे. उंदराच्या मांसाशिवाय दुसरा कोणताही पदार्थ त्याला फारसा आवडत नाही, हे लक्षात ठेव.

तात्पर्य : बाह्य देखावा आणि सौंदर्य यावरुन माणसाच्या अंतरंगाची परीक्षा होणे शक्य नाही.

==============
वर्तमानपत्रातून संग्रहित 
==============

(संगत)

कथा क्र. 124

एक गोसावी रानातून आपल्या गुहेकडे चालला होता. वाटेत त्याला एक अस्वल कण्हताना दिसले. गोसावी त्याच्या जवळ गेला, त्याने पाहिले, अस्वलाच्या पायात काटा रुतला होता. त्याने तो काढला तेव्हा अस्वल म्हणाले, "महाराज मला वेदनेतून मुक्त करून माझ्यावर फारच उपकार केलेत. मला त्याची परतफेड म्हणून तुमच्याबरोबर राहून तुमच्या सेवेची संधी द्या. गोसावी म्हणाला, "अरे मी काही उपकार केले नाहीत, माझा धर्मच आहे तो. तरीही अस्वल आपला हट्ट सोडेना. शेवटी गोसावी त्याला आपल्याबरोबर गुहेत घेऊन गेला. गोसावी विश्रांतीसाठी झोपला तेव्हा त्याच्या तोंडावर माशा बसत होत्या. गोसाव्याची सेवा करावी म्हणून ते अस्वल या माशांना मारू लागले, हाकलू लागले. पण एक धटींगण माशी गोसाव्याच्या नाकावर पुन्हा पुन्हा बसत होती. त्या माशीचा राग येऊन अस्वलाने आपला पंजा माशीला एवढ्या जोराने मारला की माशीचा चेंदामेंदा झाला, पण गोसाव्याचे नाकही तुटले व त्याचा चेहरा विद्रूप झाला!

तात्पर्य : शहाण्याचे सेवक व्हावे, पण मूर्खाचे मालक होऊ नये. काही वेळा चांगल्या संगतीचा वेगळाच परिणाम होतो.


==============
वर्तमानपत्रातून संग्रहित 
==============