शुक्रवार, ३० मे, २०१४

राजाची महानता

 कथा क्र.208 

भोजराजा महादानी आणि धार्मिक प्रवृत्तीचा होता. त्‍याच्‍या उदारपणाच्‍या अनेक कथा त्‍याच्‍या राज्‍यापासून अन्‍य राजातही प्रसिद्ध होत्‍या. याच कारणांमुळे तो बहुसंख्‍य लोकांचे श्रद्धास्‍थान बनलेला होता. राजा भोज यांना एकदा अस्‍वस्‍थ वाटू लागले. तेव्‍हा वैद्यांनी हात टेकले. राजा भोजने तत्‍क्षणी आपल्‍या दिवाणास निमंत्रित करून त्‍याला सांगितले, मी आता फार वेळ जगणार नाही. जेव्‍हा माझी अंत्‍ययात्रा स्‍मशानस्‍थळी घेऊन जाल तेव्‍हा माझा एक हात पांढरा व दुसरा हात काळा करा. ते दोन्‍ही हात सर्व लोकांना असे दाखवतच घेऊन जा. भोज राजाची ही इच्‍छा दिवाणास मोठी विचित्र वाटली. त्‍याने विचारले, महाराज असे करण्‍यासाठी तुम्‍ही का सांगता आहात. राजा म्‍हणाला,’’माझे रिकामे हात पाहून सगळ्यांना माहित होईल की राजा असो वा भिकारी सर्वजणच रिकाम्‍या हातानेच जातात. पांढरा आणि काळा रंगांचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे की व्‍यक्तिसोबत जे जाते ते त्‍याचे चांगले किंवा वाईट कर्म. मला यातून सर्वाना हेच सुचवायचे आहे की जन्‍मापासून मृत्‍यूपर्यंत सत्‍कर्म आणि चांगले आचरण ठेवावे.’’

तात्‍पर्य :- जन्‍मापासून मृत्‍यूपर्यंत सत्‍कर्म आणि चांगले आचरण ठेवावे.

मंगळवार, २७ मे, २०१४

दृढनिश्‍चय

   कथा क्र.207  

श्रीपूर येथील राजा यांच्‍या निधनानंतर त्‍यांचा मुलगा राजवीरसिंह याला राज्‍यपदी बसविण्‍यात आले. राजवीर वडिलांसारखाच साहसी होता पण अनुभव पाठीशी कमी असल्‍यामुळे अनेकदा संकटात तो घाबरत असे. अशावेळी त्‍याची माता त्‍याला हिंमत देत असे व योग्‍य मार्गदर्शन करून संकटातून बाहेर काढत असे. शेजारच्‍या राज्‍यातील गंगानगरमधील राजा भीमसेन याची श्रीपूरवर नजर होती. एके दिवशी भीमसेनने श्रीपूरवर आक्रमण केले. दोन्‍ही सैन्‍ये एकमेकांना भिडली, तुंबळ युद्ध झाले. भीमसेनकडे सैनिक खूप प्रमाणात होते. आतापर्यत दिलीपसिंह याने कमी प्रमाणात सैनिक असूनसुद्धा भीमसेनविरोधात केवळ धाडसी व कल्‍पक वृत्‍तीने युद्धे जिंकली होती. परंतु राजवीरसिंह यात आपले सातत्‍य ठेवू शकले नाहीत. दोनच दिवसात भीमसेन यांनी चार मैल भागावर आपला ताबा मिळविला. राजवीरच्‍या तोंडून कमी सैनिकांमुळे आपल्‍याला हार पत्‍करावी लागली हे ऐकले तेव्‍हा राजमातेने मनातल्‍या मनात काही ठरवले. राजवीर झोपण्‍याआधी राजमातेचे दर्शन घेण्‍यासाठी आला तेव्‍हा राजमाता लहान लहान सहा लाकडाच्‍या काड्या एकत्र बांधून लोखंडाच्‍या मोठ्या तुकड्याला तोडण्‍याचा प्रयत्‍न करीत असलेली पाहिली. राजवीरने मातेला विचारले,’’आई, सहा लाकडाच्‍या काड्या एकत्र करूनही लोखंडाला तोडू शकत नाही’’ राजमाता म्‍हणाली,’’खरं बोललास, संख्‍येने मजबुतीला पराजित केले जाऊ शकत नाही त्‍याप्रमाणे आपले वीर सैनिक आणि तू या लोखंडासारखे मजबूत व्‍हा. शत्रूची कितीही संख्‍या तुम्‍हाला तोडू शकणार नाही अशी ताकद तुमच्‍यात आहे ती जागृत करा. तुमच्‍या मजबुतीसमोर शत्रू गुडघे टेकेल.’’ राजवीरने याप्रमाणे केले व त्‍याने भीमसेनाला हरवून युद्धात विजय संपादन केला.

तात्‍पर्य :दृढ मनोबलाने हारलेले युद्धही जिंकता येते. काही काही वेळेला दृढनिश्‍चय, ठाम मनोबल हेच यशाचे इंगित ठरते. 

गुरुवार, २२ मे, २०१४

तेनालीराम आणि स्वप्न महाल

कथा क्र.206

एके रात्री रात्री राजा कृष्‍णदेवराय याला स्‍वप्‍न पडले. त्‍या स्‍वप्‍नामध्‍ये त्‍याने एक सुंदर महाल पाहिला. तो महाल खूप सुंदर होता, महाल अधांतरी तरंगत होता. महालाला सुंदर सुंदर दालने होती, दालनात रंगीबेरंगी रत्‍ने लावली होती. महालात विशेष प्रकाशयोजना केलेली नव्‍हती जेव्‍हा मनाला वाटेल तेव्‍हा आपोआप प्रकाश पडत असे व जेव्‍हा प्रकाश नको वाटे तेव्‍हा अंधार होत असे. सुखसंपन्‍नतेने सजलेला तो महाल म्‍हणजे एक आश्‍चर्य होते. पृथ्‍वीवरच्‍या कोणत्‍याही माणसाला भुरळ पाडेल अशाच प्रकारची त्‍या महालाची रचना होती. हे स्‍वप्‍नात राजाने पाहिले आणि जागा होताच त्‍याने आपल्‍या राज्‍यात दवंडी पिटवली की, जो कोणी मला अशा वर्णनाचा महाल बनवून देईल त्‍याला एक लाख सुवर्णमुद्रा बक्षीस देण्‍यात येतील. सर्व राज्‍यात राजाच्‍या या स्‍वप्‍नाची चर्चा होऊ लागली. जो तो हेच म्‍हणू लागला की अशा प्रकारचा महाल फक्त स्‍वप्‍नात बनू शकतो. राजाला बहुधा हे कळत नसावे अशाच आशयाची चर्चा सर्वत्र होऊ लागली. राजाने आपल्‍या राज्‍यातील सर्व कारागिरांना बोलावले त्‍यांना सूचना दिल्‍या. अंगात विविध कौशल्‍ये असणारे कुशल कारागिर राजाला समजावू लागले,’’महाराज, अशा प्रकारचा महाल कधीच बनू शकत नाही. तुम्‍ही याचा नाद सोडून द्या’’ पण राजाच्‍या डोक्‍यात आता तो महाल बांधण्‍याचे ठरलेच होते. काही स्‍वार्थी लोकांनी मात्र याचा चांगलाच लाभ करून घेतला. त्‍यांनी महाल बांधण्‍यासाठी राजाकडून पैसे घेतले. राजाने महाल बांधून देण्‍याचे आश्‍वासन देऊन ती माणसे गायब झाली होती. मात्र मंत्री लोकांना याचे वाईट वाटत होते की राजाला माणसे फसवित आहेत. कोणीही मंत्री राजाला समजावून सांगायला पुढे जात नव्‍हता. यातून फक्त एकच माणूस राजाला समजावू शकत होता तो म्‍हणजे तेनालीराम आणि तो काही दिवसांसाठी बाहेरगावी गेला होता. एक दिवस राजाचा दरबार सुरु झाला आणि एक म्‍हातारा माणूस रडत, मोठ्याने ओरडत दरबारात आला. राजाने त्‍याला न रडण्‍याची विनंती केली व म्‍हणाला,’’ वृद्धबुवा काय झाले, चिंता करू नका, मी काही तुमची मदत करू का. तुम्‍हाला न्‍याय मिळेल याची तुम्‍ही ,खात्री बाळगा.’’ म्‍हातारा रडायचे थांबवून राजाला म्‍हणाला,’’महाराज, मला सर्वानी लुटले, माझ्या जीवनभराची कमाई कुणीतरी चोरी केली. महाराज, मला छोटी छोटी मुले आहेत आता तुम्‍हीच सांगा की मी त्‍यांना कसे जगवू.’’ राजाला हे ऐकून खूप राग आला व संतापाने राजा म्‍हणाला,’’ मला सांगा, कोणी तुम्‍हाला छळले, कोणी तुमची संपत्ती हडप केली. माझा कोणी कर्मचारी तुम्‍हाला जर त्रास देत असेल तर सांगा.’’ म्‍हातारा म्‍हणाला,’’ नाही महाराज तुमचा कोणीही कर्मचारी मला त्रास देत नाहीये’’ राजा म्‍हणाला,’’ मग तुमची संपत्ती कुणी हडप केली अशी तुमची तक्रार आहे’’ म्‍हातारा म्‍हणाला,’’ महाराज, क्षमा असावी पण काल रात्री मला एक स्‍वप्न पडले, त्‍या स्‍वप्नात तुम्‍ही स्‍वत:, तुमचे मंत्री आणि दरबारातले सर्व कर्मचारी सगळे मिळून माझ्या घरी आलात आणि माझ्या घरातील तिजोरी तुम्‍ही सर्वानी मिळून उचलली आणि ती तुम्‍ही तुमच्‍या राजखजिन्यात जमा करून घेतली.’’ राजा अजूनच संतापला व म्‍हणाला,’’ मूर्खासारखे बोलू नको, अरे सत्‍यात तर काय मी स्‍वप्‍नातसुद्धा असा अत्‍याचार करणार नाही आणि मूर्ख माणसा स्‍वप्‍ने कधी सत्‍य होतात काय याची तुला जाणीव आहे की नाही.’’ हे वाक्य संपताक्षणी त्‍या म्‍हाता-याने आपली नकली दाढी व फेटा काढून टाकला व आपल्‍या मूळ अवतारात हजर झाला. तो तेनालीराम होता. तेनालीराम म्‍हणाला,’’ महाराज अशक्‍य स्‍वप्‍ने सत्‍यात येऊ शकत नाहीत हेच मला तुम्‍हाला सांगायचे होते. माणसाने स्‍वप्‍ने सत्‍यात आणण्‍याचा प्रयत्‍न करावा हे योग्‍य आहे पण अशक्‍य असणा-या स्‍वप्‍नांच्‍या मागे कधीच पळू नये असे मला वाटते.’’ राजाला आपली चूक कळून आली. त्‍याने तेनालीरामला चांगला सल्‍ला दिल्‍याबद्दल बक्षीस दिले.

तात्‍पर्य :- योग्‍य माणसांचा सल्‍ला काही वेळेला उपयोगी ठरतो, अशाच माणसांची संगत ठेवणे चांगले ठरते. 

शनिवार, १७ मे, २०१४

दळणाचे जाते आणि खजिना

कथा क्र.205

राजा भीमसेन याला आपल्‍या दौलतीबद्दल प्रचंड घमेंड होती. एके दिवशी त्‍याला त्‍याचा मित्र समशेर भेटण्‍यासाठी म्‍हणून आला. मित्राचे राजाने मनापासून स्‍वागत केले. त्‍याचा यथायोग्‍य पाहुणचार केला. विश्रांतीनंतर राजाने त्‍याला आपला महाल पाहण्‍यासाठी आमंत्रण दिले. दोघेहीजण महालातून फिरत असताना राजाने आपल्‍या श्रीमंतीचा थाट मित्राला दाखविण्‍यास सुरुवात केली. सर्वत्र त्‍याच्‍या श्रीमंतीचे कोंदण कसे आहे याबद्दल राजा मोठ्या गर्वाने सर्व माहिती देत होता. सर्व ठिकाणी फिरून झाल्‍यावर राजाने शेवट त्‍याला आपल्‍या खजिन्‍याच्‍या खोलीकडे नेले. राजाचा प्रचंड मोठा खजिना पाहून समशेरचे डोळे दिपून गेले. तो अचंबित होऊन खजिना पाहतच बसला. राजा खजिन्‍याबद्दल माहिती सांगतच होता की हा खजिना किती किंमती आहे. अनेक दुर्मिळ रत्‍ने, अलंकार, जडजवाहिर, मोती, सोने, चांदी, अनमोल अशा वस्‍तू कशा मी जमा केल्‍या आहेत. या खजिन्‍याच्‍या सुरक्षेसाठी काहीशे सैनिक चोवीस तास पहारा देत असतात. अशी सर्व माहिती राजा देत असतानाच समशेर ऐकत होता पण त्‍याचे राजाच्‍या बोलण्‍याकडे दुर्लक्ष होत होते. काही वेळाने समशेर शेवटी राजाला म्‍हणाला,’’मित्रा हे इतके धन तू जमा केलेले आहेस पण याचा दुस-यांनाही काही फायदा होतो की नाही’’ राजा म्‍हणाला,’’ अरे मित्रा, इतक्‍या बहुमूल्‍य अशा खजिन्‍याचा माझ्याशिवाय दुस-या कोणाला फायदा होणार आहे.’’ यानंतर समशेर राजाला बरोबर घेऊन एका झोपडीकडे गेला. तिथे एक वृद्ध महिला जात्‍यावर धान्‍य दळत बसली होती. समशेरने राजाला ते दळणाचे जाते दाखवून म्‍हणाला,’’ राजा हे जातेही दगडाचे आहे आणि तुझ्या खजिन्‍यात तू जी रत्‍ने ठेवली आहेत ती पण दगडाचीच आहेत. फरक इतकाच आहे की त्‍या रत्‍नांचा तुझ्याशिवाय कुणालाच फायदा नाही आणि या दगडाच्‍या जात्‍याचा मात्र सगळ्या गावाला फायदा होतो. गावकरी मंडळी येथे येतात व धान्‍य दळून घेऊन जातात. तू ज्‍यांना रत्‍नांच्‍या पहा-याला सैनिक उभे केले आहेत त्‍यांच्‍या अंगी शक्ती येते ती सुद्धा या जात्‍यातून निघणा-या पीठामधून. म्‍हणून राजन मला तुझ्या सर्व खजिन्‍यापेक्षा, राज्‍यातील सर्व श्रीमंतीपेक्षा ही दगडाची जाती मला सर्वश्रेष्‍ठ वाटली.’’  राजाला आपली चूक कळाली व त्‍याची घमेंड पूर्ण उतरून गेली.


तात्‍पर्य :- ज्‍या गोष्‍टीने मानव समाजाचे कल्‍याण होत असेल अशा गोष्‍टी करणे हितकर असते. मनुष्‍यजन्‍मात येऊन जर इतरांचे हित पाहता येत नसेल तर असा मनुष्‍यजन्‍म काय कामाचा.

शुक्रवार, ९ मे, २०१४

जीवनाचे रहस्य

  कथा क्र.204  

एकदा एका कसायाकडे त्‍याचा एक मित्र त्‍याला भेटण्‍यासाठी गेला होता. तिथे त्‍याने असे पाहिले की, एका मोठ्या पिंज-यात खूप असे बोकड, मेंढ्या कैद आहेत आणि एकमेकांशी मस्‍ती करत आहेत. मोठ्या आनंदात ते प्राणी आहेत. दुसरीकडे त्‍याने असे पाहिले की त्‍याच पिंज-यातून एकेक बोकड काढून तो कसाई कापत आहे आणि त्‍याचे मांस विकत आहे. कसायाच्‍या मित्राला ही गोष्‍ट पाहून कसेतरी वाटले. तो त्रस्‍त झाला कारण ज्‍यावेळी प्रत्‍येक बोकडाला कसाई बाहेर काढून कापत असे हे जाळीतून पिंज-यातल्‍या प्रत्‍येक बोकडाला दिसत होते पण तरीसुद्धा ते बोकड आपला कुणीतरी मित्र मरतो आहे याची जाणीव न ठेवता आनंदात कसे राहत होते याचे त्‍या मित्राला राहून राहून आश्‍चर्य वाटत होते. ते बोकड आपल्‍याच मस्‍तीत खेळत, बागडत, आनंदात त्‍या पिंज-यात राहतात कसे याचे त्‍या मित्राला कोडे पडले होते. शेवटी न राहवून त्‍याने त्‍या कसाई मित्राला याचे कारण विचारले असता कसाई म्‍हणाला,’’ अरे मित्रा, फार सोपे कारण आहे. मी त्‍या प्रत्‍येक बोकडाच्‍या कानात असे सांगितले आहे की, सगळे बोकड मेले तरी हरकत नाही पण मी तुला काही कापणार नाही. त्‍यामुळे तू आनंदात राहा. तू एकमेव बोकड असा असशील की जो शेवटपर्यंत जिवंत राहशील. त्‍यामुळे ते प्रत्‍येक बोकड हे आपण जिवंत राहणार या आनंदात आहे आणि हे त्‍याचमागचे रहस्‍य आहे.

तात्‍पर्य :- या पिंज-यातल्‍या बोकडासारखीच माणसाची अवस्‍था आहे. प्रत्‍येकालाच असे वाटत राहते की, मी शेवटपर्यंत जिवंत राहणार आहे पण कधी ना कधी आपला नंबर हा येणारच आहे. जीवन जगताना आपण याची निश्चितच जाणीव ठेवली पाहिजे की आपणही कधीतरी मरणार आहोत.

बुधवार, ७ मे, २०१४

प्रामाणिकपणा

     कथा क्र.203      

सऊदी अरब मध्‍ये बुखारी नामक एक विद्वान राहत होते. ते आपल्‍या प्रामाणिकपणासाठी खूप प्रसिद्ध होते. एकदा त्‍यांनी दूरचा समुद्रप्रवास करण्‍याचे ठरविले व त्‍याप्रमाणे ते प्रवासाला निघाले. त्‍यांनी प्रवासात आपल्‍यासोबत खर्चासाठी म्‍हणून एक हजार दिनार एका थैलीत बांधून घेतले होते. प्रवासाला सुरुवात झाली, या प्रवासाला निघालेल्‍या अन्‍य काही जणांबरोबर बुखारी यांची ओळख यानिमित्ताने झाली. बुखारी त्‍यांनी जीवनदर्शनाबद्दल सांगत असत. एक प्रवासी मात्र बुखारीजींच्‍या जास्‍त सहवासात राहिल्‍याने तो त्‍यांचा जवळचा माणूस बनला. बुखारीजी जिकडे जात, खात, हिंडतफिरत तिथे तो माणूस त्‍यांच्‍यासोबत असे. असेच एकदा बुखारीजींनी स्‍वत:जवळची दिनारांची थैली उघडली व त्‍यातील रक्कम काढून ते मोजू लागले. त्‍यावेळीही तो माणूस तिथेच होता. त्‍याने ती पैशांची थैली पाहिली व त्‍याला त्‍या पैशांचा मोह झाला. त्‍याने ती थैली चोरायचा कट मनातल्‍या मनात शिजवला. एकेदिवशी सकाळी तो जोरजोराने ओरडू लागला,’’ या अल्‍ला, या खुदा, मी पुरता लुटलो गेलो, माझे एक हजार दिनार चोरीला गेले. चांगले थैलीत बांधून आणलेले माझे पैसे कुणी हरामखोराने पळविले कुणास ठाऊक मला या संकटात कसे काय अडकावले आहे’’ जहाजावर असणा-या कर्मचा-यांनी त्‍याला धीर देण्‍याचा प्रयत्‍न केला, त्‍याला समजावले की बाबा तुझे पैसे कुठेही जाणार नाहीत या लोकांपैकी जर कुणी घेतले असतील तर आपण त्‍यांना ते परत देण्‍यास सांगू या. जहाजाच्‍या कर्मचा-यांनी सर्वाची झडती घेण्‍यास सुरुवात केली. सर्वात शेवटी नंबर आला तो बुखारीजींचा. त्‍यांच्‍यापाशी जाताच कर्मचारी म्‍हणाले,’’ अरे तुमची कशी बरे आम्‍ही झडती घ्‍यावी. तुमची झडती घेणे म्‍हणजे सुद्धा देवाचा गुन्‍हा ठरेल. इतक्‍या प्रामाणिक आणि सच्‍च्‍या माणसाला आम्‍ही कसे तपासू.’’ हे ऐकून बुखारी म्‍हणाले,’’ नाही, ज्‍याचे पैसे चोरीला गेले आहेत त्‍याच्‍या मनात माझ्याबद्दल शंका राहिल, संशय बळावेल तेव्‍हा तुम्‍ही माझी व माझ्या सर्व सामानाची झडती घ्‍या’’ बुखारींची झडती झाली त्‍यात त्‍यांच्‍याकडे एक दमडासुद्धा मिळाला नाही. हा प्रसंग इथेच संपला. मात्र दोन दिवसांनी न राहवून तो चोरीची बोंब ठोकणारा प्रवासी बुखारींकडे आला व म्‍हणाला,’’ महाराज, तुमच्‍याकडे तर एक हजार दिनार होते हे मला माहित आहे. मी स्‍वत: ते पाहिले आहेत मग ते कुठे गेले’’ बुखारी हसून म्‍हणाले,’’ मित्रा, मी आयुष्‍यात कधीच धनाची चिंता केली नाही. मी फक्त प्रामाणिकपणा जपला. माझ्यावर ज्‍यावेळी झडतीची वेळ आली त्‍याच्‍याआधीच काही क्षण मी ते पैसे समुद्रात फेकून दिले होते. जर माझेच पैसे माझ्याजवळ सापडले असते तर कुठेतरी संशयाची सुई माझ्याभोवती फिरली असती म्‍हणून मी स्‍वत:च्‍या हाताने धन समुद्रात टाकले. तुला खरे वाटणार नाही पण ही गोष्‍ट जहाजावरील ब-याचजणांना माहिती आहे त्‍यामुळे तेच माझा आता खर्च करत आहेत. मी या हाताने धन जरी टाकले असले तरी माझ्या प्रामाणिकपणामुळे मला अनेक हातांनी मदत केली आहे. लोकांचा कायमच प्रामाणिक माणसांवर विश्‍वास बसतो.’’


तात्‍पर्य :- जगात प्रामाणिकपणासारखा चांगला गुण नाही. प्रामाणिक माणसेच जगाला पुढे नेत आहेत हे ही शाश्‍वत सत्‍य आहे. 

क्रोधाला तिलांजली

  कथा क्र.202  

एकदा भगवान महा‍वीरांचे दर्शन घेण्‍यासाठी राजा श्रेणीक आणि राणी चेलना दोघेही गेले होते. त्‍यांना भेटून दोघेही फारच प्रभावित झाले. परतत असताना वाटेत राणीला एक मुनी तपश्‍चर्येत मग्‍न दिसले. त्‍यांच्‍या अंगावर एकच वस्‍त्र होते. कडाक्‍याच्‍या थंडीतसुद्धा ते मुनी कठोर तपश्‍चर्या करत होते. राणीने प्रभावित होऊन मुनींना नमस्‍कार केला. महालात आल्‍यानंतर राणी शयनकक्षात निद्रिस्‍त झाली. रात्रभर तिचा एक हात पलंगाखाली लटकत राहिल्‍याने आखडला व सकाळी तो हात ठणकू लागला. दासींनी तिचा हात शेकून देण्‍यास सुरुवात केली तेव्‍हा राणीला अचानक जंगलातील त्‍या मुनींची आठवण झाली. त्‍याने तर भर थंडीतसुद्धा एका वस्‍त्रात स्‍वत:चे शरीर लपेटले होते. राणीला ह्याची आठवण होऊन तिच्‍या तोंडून अचानक शब्‍द बाहेर पडले,’’अगं बाई गं, त्‍या बिचा-याचे कसे हाल झाले असतील’’ तेवढ्यात राजाचे तेथे आगमन झाले व हे वाक्य ऐकून राजाचा असा समज झाला की राणीचे दुस-या कोणावर तरी प्रेम आहे. राजाला हे ऐकून खूप राग आला. रागाच्‍या भरात त्‍याने मंत्र्याला बोलावून आपल्‍या अंत:पुराला आग लावण्‍याचे आदेश दिले. त्‍यानंतर तो भगवान महावीरांकडे गेला. त्‍यांना सगळी हकिकत सांगितली. महावीर म्‍हणाले,’’राजा श्रेणिका, राणी चेलना पतिव्रता आहे. त्‍यांनी दिव्‍यदृष्‍टीच्‍या सहाय्याने मुनींबाबतचा तो प्रसंग आहे हे स्‍पष्‍ट केले.’’ श्रेणिकाचा राग शांत झाला. तो महालात आला मंत्र्याला विचारले की तू अंत:पुराला आग लावलीस का. मंत्र्याने होकारार्थी मान डोलावली. राजाला खूप दु:ख झाले हे पाहून मंत्री म्‍हणाला, राजन मी जाणून होतो, तुम्‍ही रागात आदेश दिले आहेत त्‍यामुळे मी हत्तीशाळा जाळली, अंत:पूर जाळले नाही. राजाला आपल्‍या चुकीची जाणीव झाली. त्‍याने राग सोडून देण्‍याचा संकल्‍प केला.


 तात्‍पर्य :-क्रोध व अविचार एकत्र राहतात. अविचाराने केलेली कोणतीही कृती नाशास कारणीभूत ठरते. क्षणिक येणारा राग माणसाला आयुष्‍यभराचे नुकसान भोगायला लावतो. राग माणसाचा शत्रू आहे असेच सर्व संतांनी सांगितले आहे. 

शनिवार, ३ मे, २०१४

निरूत्तर

  कथा क्र.201  


अरब देशात हातिमताई हा त्‍याच्‍या उदारपणासाठी प्रसिद्ध होता. हातिमताई मोकळ्या हाताने दान करायचा. त्‍याच्‍या दरवाजातून कोणीही विन्‍मुख होऊन परतत नसे. तो कोणाही गरजूला आपली मौल्‍यवान वस्‍तू देण्‍यास मागे हटत नसे. लोक त्‍याच्‍याकडे बिनधास्‍तपणे येत असत. ते जे काही मागत ते हातिमताई देत होता एकदा हातिमताई मनात विचार आला, आपण मोठी दावत आयोजित करावी. ज्‍यात सर्वच स्‍तरातील व्‍यक्तिंना येण्‍याची मुभा असेल. यासाठी हातिमताईने खुले निमंत्रण दिले. दावतच्‍या दिवशी लोकांचे येणेजाणे सुरु झाले. हातिमताई प्रत्‍येकाचे स्‍नेहपूर्वक स्‍वागत करत होता. जेवल्‍यावर लोक त्‍याला आशिर्वाद देत होते. काही वेळाने हातिमताईने विचार केला. दावतीचे ठिकाण दूर राहणा-या लोकांसाठी अडचणींचे ठरत आहे, त्‍यांना सवारीतून घेऊन यावे. आपल्‍या काही साथीदारांना घेऊन तो दूर राहणा-या लोकांना भेटण्‍यास गेला. वाटेत त्‍याला एक लाकूडतोड्या दिसला. त्‍याच्‍या चेह-यावर थकावट स्‍पष्‍टपणे दिसत होती. हातिमताई म्‍हणाला,’’ मित्रा, जेव्‍हा हातिमताईने दावतचे खुले आमंत्रण दिले तेव्‍हा तू इतकी मेहनत कशासाठी करत आहेस. हे काम सोड, आणि माझ्या दावतमध्‍ये सामील हो. आरामात जेवण कर.’’ हे ऐकून लाकूडतोड्याने उत्तर दिले,’’ जे आपली भाकरी कष्‍टाने कमावितात त्‍यांना हातिमताईच्‍या जेवणाची गरज नाही. हातिमताई उदार असेल पण आमची कष्‍टाने मिळवलेली भाकरी ही त्‍याच्‍या दावतच्‍या जेवणापेक्षा कित्‍येक पटीने गोड आहे. हवे असेल तर तूच ती भाकरी खाऊन बघ’’ हे ऐकून हातिमताई निरूत्तर झाला.


तात्‍पर्य :- आपल्‍या कष्‍टाने जे लोक आपले जीवन जगतात त्‍यांच्‍या गरीबीची किंमत ही सुद्धा श्रीमंतच्‍या धनापेक्षा कित्‍येक पटीने जास्‍त असते.